राज्यातील बाल मृत्यूदर कमी करणे आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात गरोदरपणात नोंदणी करून तेथेच प्रसूती करणाऱ्या महिलांना पहिल्या प्रसूतीच्या वेळी नवजात बाळासाठी (मुलगा किंवा मुलगी) सुमारे २,००० रुपयांपर्यंतची बेबी केअर किट बॅग मोफत दिली जाते.
बेबी केअर किटमध्ये समाविष्ट साहित्य
- बाळासाठी कपडे
- प्लास्टिक लंगोट
- बाळाला झोपण्यासाठी लहान गादी
- बाळासाठी टॉवेल
- इलेक्ट्रॉनिक थर्मामीटर
- बाळाच्या अंगाला लावण्यासाठी तेल (२५० मि.ली.)
- मच्छरदाणी
- बाळासाठी गरम ब्लँकेट
- प्लास्टिकची लहान चटई
- बाळासाठी शॅम्पू (६० मि.ली.)
- खुळखुळा
- बाळाची नखे कापण्यासाठी नेलकटर
- बाळासाठी हातमोजे आणि पायमोजे
- आईसाठी हात धुण्याचे लिक्विड
- बाळाला बांधण्यासाठी कापड / आईसाठी लोकरीचे कापड
- बाळासाठी बॉडी वॉश लिक्विड
- सर्व साहित्य ठेवण्यासाठी लहान बॅग
अर्ज कुठे करायचा?
शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात नाव नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांनी गर्भधारणेच्या ९व्या महिन्यात जवळच्या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेकडे माहिती किंवा अर्ज द्यावा. त्यानंतर संबंधित लाभार्थी महिलेला अंगणवाडी सेविकेमार्फत बेबी केअर किट बॅग प्रदान केली जाते.
